Home > Latest News > शिवार संसद च्या हेल्पलाईनमुळे वाचले महिलेचे प्राण

उस्मानाबाद : विवेक पोर्लेकर

हांडोग्री, (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील विजेच्या धक्क्याने मयत झालेले शेतकरी शिवशंकर दिनकर साखरे यांच्या विधवा पत्नी सोनाली साखरे यांना शिवार संसद च्या हेल्पलाईनमुळे जीवदान मिळाले आहे. 09 जूलै 2016 ला शिवशंकर यांचे निधन झाले. एक वर्ष होऊनही त्यांच्या पत्नीला कोणतीही शासकीय मदत न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. याची माहिती शिवार संसद च्या हेल्पलाईनवर मिळाली. संस्थेतील विकास याने हांडोग्री येथे तातडीने धाव घेतली. विधवा महिलेचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

साखरे यांची 2 एकर शेती पडीक आहे. त्यामुळे त्या मजूरी करुन उदरनिर्वाह करतात. त्यांची मोठी मुलगी श्रावणी 4 वर्षाची, तर श्रेया 2 वर्षाची आहे. घरी वयस्कर सासू-सासरे असून त्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे.

शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु, त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. तेव्हा शासन स्तरावर याची दखल घेवून त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे मत हांडोग्री येथील नागरिक करत आहेत.

शिवार संसद चळवळ ही कोल्हापूरातील विनायक हेगाना या बी.एस्सी. अॅग्रीकल्चर झालेल्या विद्याथ्याने सुरू केली आहे. त्याने ‘शेतकरी आत्महत्या – कारणे व शाश्वत उपाय’ हे पुस्तक लिहिले आहे.  या पुस्तिकेची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे.  एन.एस.एस. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे पुस्तक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यास सुरु केले आहे. यातून शेतकऱ्यांना सामाजिक,  आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शेतीसंबंधीत – पीकविमा, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, हवामान अंदाज, माती परिक्षण, निर्यात आणि माहिती तंत्रज्ञान याबद्दलची माहिती पुरवली जाते. शिवार संसद ने शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. 9146366407, 7350302202, 8668778100, 7768905630, 9112375398 या क्रमांकावर संपर्क साधल्यास शेती संबंधीत सर्व माहिती दिली जाते. अधिक माहितीसाठी www.shivarsansad.com ही वेबसाईट सुरू केली आहे.शासकीय स्तरावरुन कोणतीही मदत नाही

News Link: http://www.newstale.in/shivar-sansad-help-line/

Your email address will not be published. Required fields are marked *

*